राहुल द्रविड
राहुल द्रविड
राहुल प्रत्येक इनिंग देशासाठी खेळला, तो स्वत:साठी कधीही खेळला नसल्याचं राहुल द्रविडच्या आई पुष्पा द्रविड यांनी स्टार माझाशी बोलतांना म्हटलंय

राहुल द्रविडनं कारकीर्दीतल्या अखेरच्या वन डेत अर्धशतक ठोकलं.भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातला पाचवा आणि अखेरचा वन डे सामना कार्डिफच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात द्रविड आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी रचली. आणि कर्णधार धोनीनं अवघ्या २६ चेंडूंत नाबाद ५० धावा कुटल्या. त्यामुळंच भारताला ५० षटकांत सहा बाद ३०४ धावांची मजल मारता आली.

द्रविडनं ७९ चेंडूंत ६९ धावांची खेळी करून वन डे कारकीर्दीला रामराम ठोकला. ग्रॅमी स्वानच्या गोलंदाजीवर द्रविडचा त्रिफळा उडाला. द्रविड पॅव्हेलियनमध्ये परतत असताना इंग्लिश खेळाडूंनी दिशेनं धाव घेऊन त्याचं अभिवादन केलं.

इंग्लंडदौऱ्यातील कार्डिफची अखेरची वन डे खेळून टीम इंडियाची द वॉल राहुल द्रविड आज वन डे क्रिकेटला अलविदा करणाराय. १५ वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर उदयास आलेल्या एका तेजस्वी ताऱ्याचा यानिमित्तानं आज अस्त होतोय. ३०० हून अधिक वन डे खेळणाऱ्या राहुल द्रविडनं आजवर ११ हजारांच्या आसपास धावा केल्यात.

टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून राहुल द्रविडचं नाव घेतलं जातं. जेव्हा जेव्हा टीमला गरज पडली तेव्हा तेव्हा राहुल द्रविड टीमच्या मदतीला धावून आला.

अनेकदा खडरत परिस्थितीतूनही त्यानं टीमची नैय्या पार केली. इतकंच काय तर मध्यंतरी टीमला गरज होती तेव्हा ग्लोव्हज चढवून त्यानं विकेटकिपिंगही केली. राहुल द्रविड हा वन डेचा क्रिकेटर नाही अशी टीका अनेकदा त्याच्यावर करण्यात आली. मात्र द्रविड नेहमीच शांत राहीला.

राहुल द्रविडला गेली २ वर्ष वन डे क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आलं होतं. मात्र इंग्लंड दौऱ्यातील भारतीय फलंदाजीची झालेली दुर्दशा पाहता या दौऱ्याच एकमेव अपवाद ठरलेल्या राहुल द्रविडला टीममध्ये घेण्याशिवाय राष्ट्रीय निवड समितीसमोर पर्यायच शिल्लक नव्हता. त्यामुळे हीच संधी साधून राहुल द्रविडनं सन्मानानं वन डे क्रिकेटला अलविदा करण्याचं निश्चित केलं.